मसूरी पहिला भाग :- https://www.vandanpawar.com/post/मसूरी-उत्तराखंड-भाग-पहिला
मसुरीच्या दोन दिवसाच्या मुक्कामानंतर मी ऋषिकेशला निघालो. आदल्यादिवशीच मसूरी ते ऋषिकेश प्रवास कसा करायचा याची चौकशी झाली होती. एक तर तुम्ही थेट कॅबने मसूरीवरून ऋषिकेशला एक-दीड तासात पोहचू शकतो. कॅबने प्रवास करणे हा सर्वात सोपा पर्याय पण प्रवासात मला शक्यतो थेट कॅबने प्रवास आवडत नाही. कारण त्यामध्ये फक्त वरवर नवीन शहर दिसत त्यामुळे कॅबने प्रवास मी टाळतो. ऋषिकेशला पोहचण्याचा दुसरा पर्याय होता तो पब्लिक ट्रान्सपोर्टने via डेहराडून. त्यामुळे मी पब्लिक ट्रान्सपोर्टने पहिले डेहराडून आणि नंतर ऋषिकेशला जाण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी सकाळी माझ्या हॉस्टेलपासून अगदी जवळच असलेल्या लायब्ररी रोडवरून मला डेहराडूनला जायला टमटम मिळाली. डेहराडून ४०-४५ किमी लांब असल्याने १ तासात तेथील बसस्टॅन्ड पोहचलो. पुण्यावरून डेहरादूनला पहिल्यादिवशी येऊन इथूनच मी मसुरीला गेलो होतो. उत्तराखंडमधील दिवस झटपट निघत होते, अजून फक्त ५ रात्रीचा मुक्काम शिल्लक होता. इथून मला ऋषिकेशला जायला ISBT बसस्थानक गाठायचे होते त्यासाठी मी अजून एक रिक्षा पकडून तिकडे पोहचलो. तिथून मला ऋषिकेश जाणारी बस मिळाली आणि माझा प्रवास सुरु झाला. ऋषिकेश आणि हरिद्वार एकाच रस्त्यावर असल्याने हरिद्वार गाडीनेही ऋषिकेशला पोहचू शकतो. बस स्थानकावर एक फरक साफ जाणवत होता तरुण मित्रमंडळी बॅकपॅक सांभाळत ऋषिकेशची बस शोधत होती तर वयस्कर मंडळी हरिद्वारची बस शोधत होते. हा पण एक आयुष्यचा टप्पा असून कदाचित माझ्यासारखे अनेक मंडळी भविष्यात थेट हरीद्वाची बस शोधत असू.
नशिबाने गाडीमध्ये जागा बरीच शिल्लक होती त्यामुळे पहिले बॅकपॅकची सोय लावली. जसे जसे दिवस पुढे सरकत होते बॅकपॅक जड होतं होती. शेवटच्या दिवशी बॅकपॅक किती जड राहिली देव जाणे. १० मिनिटांनंतर एकदाची बस निघाली आणि प्रवास सुरु झाला. ऋषिकेश इथून साधारणतः ४०-४५ किमी आहे, त्यामुळे एक दीड तासात मी ऋषिकेशला पोहचणार होतो. उत्तराखंड असूनही बाहेर वातावरण बरंच तापलेल अगदी पुण्याइतकंच ऊन इथे जाणवत होत हे पाहून थोडं नवल वाटलं. गाडीमध्ये बहुतेक पर्यटकच दिसत होते आणि त्यात उत्तर भारतीय अधिक. २ तासाच्या प्रवासानंतर ऋषिकेशला दुपारी १ वाजता पोहचलो. ऋषिकेश हे प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे तसेच योगा कॅपिटल म्हणूनही ओळखले जाते तरी येथील पायाभूत सुविधा ठिकठाकच दिसत होत्या.
माझा हॉस्टेल हे लक्ष्मण झुला जवळपास असल्याने अजून एक ४-५ किमीचा प्रवास बाकी होता. त्यासाठी रिक्षा बघायला सुरवात केल्यावर नेहमीचे उत्तर रिक्षावाल्याकडून भेटले जसे पुढे दंगल झाली आहे किंवा पुढचा रस्ता बंद झाला त्यामुळे दुसऱ्या लांबच्या रस्त्याने जावं लागेल वैगरे. तरी हे सर्व प्रकार मला माहित असल्याने त्यांना ठीक आहे म्हणून पुढे निघालो आणि लक्ष्मण झुलाला जाणारी एक shared रिक्षा भेटली. इतकं होऊनही जे व्हायचं ते झालाच रिक्षावाल्याने मला २ किमी पहिलेच लक्ष्मण झुलाच्या सोडलं. २ किमी जास्त अंतर न्हवत पण भलीमोठी बॅकपॅक घेऊन फिरणं फार जीवावर जात आणि तेही भर उन्हात. ऋषिकेश हे रिव्हर राफ्टिंग साठी प्रसिद्ध असल्याने जागोजागी राफ्टिंगचे स्टॉल्स आणि बोटी बाहेर ठेवल्या होत्या. उद्या मी पण राफ्टिंगला येणार होतोच. एकदाचा शोधाशोध करत लक्ष्मण झुला जवळ पोहचलो. गंगापत्रावर बांधलेला हा पूल भरपूर बलाढ्य होता आणि पहिल्यांदाच मी इतकं मोठं नदीपात्र बघितलं. विशेष म्हणजे इथे गंगा पूर्णतः साफ होती अजिबात कुठेच नदी दूषित दिसत न्हवती. लक्ष्मण झुला जवळच राम झुलाही आहे पण तो इथून दिसत नाही. लक्ष्मण झुला बघण्याचा गडबडीत मला अजून हॉस्टेलवर पोहचायचं आहे हे विसरूनच गेलो, जाग आल्यावर मॅपवर पाहिलं तर लक्ष्मण झुला पार पलीकडे १ किमी जायचं होतं. जागोजागी मंदिर, नदीत अंघोळ करत असलेले भाविक, भगवे कपडे घातलेले लोक दिसत होते. हे सर्व पाहून मला त्रंबकेश्वरची आठवण झाली तिथेही असाच अनुभव येतो फिरतांना. अनेक विदेशी पर्यटकही भगवे घालून फिरत होते.
शेवटी कसंतरी GoStop हॉस्टेलवर पोहचलो आणि माझ्या रूममध्ये जाऊन पहिले बॅकपॅक ठेवली. आतापर्यंत मी अनेक गोवा, अमृतसर, डलहौज़ी, मसूरी इथे हॉस्टेलमध्ये थांबलो आहे पण GoStop लक्ष्मण झुला हे सर्वोत्तम आहे. सर्वात उजवी गोष्ट म्हणजे इथल्या गच्चीवरून थेट लक्ष्मण झुला आणि गंगा पात्र दिसत होत. बाकीही अनेक गोष्टी आहे पण लोकेशन सर्वात भारी. सकाळी सुरु झालेला मसूरी ते ऋषिकेश प्रवास ५ तासानंतर संपला होता. ऋषिकेशला मी ४ दिवस थांबणार होतो आणि पुढे हरिद्वारकरून via डेहराडून पुणे गाठणार होतो. थकवा प्रचंड असल्याने आरामासाठी झोपायला गेलो आणि झोपतांना एक समाधान होत ते म्हणजे अजून पुढील ३ दिवस तरी हळूहळू जड होत जाणारी बॅकपॅक जोडीला नसेल.
ऋषिकेश हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे आणि ते इतर काही गोष्टीसाठीही प्रसिद्ध/कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे गर्दीही भरपूर असते आणि म्हणूनच फसवाफसवीचे धंदेही खूप चालतात. त्यामुळे इथे सर्वानी काळजी घेतलेली बरी.
Kommentare