गडकिल्ले भ्रमंतीमध्ये यंदा जायचं ठरलं "राजमाची" ट्रेकला. मावळ प्रांतात मोडणारा हा ट्रेक विशेषतः पावसाळ्यात भरपूर लोकप्रिय आहे. मुंबई पुण्याच्या अगदी मधोमध असल्याने दोघीकडचे पर्यटक येथे येतात. मावळ प्रांतातले तिकोना, तुंग, विसापूर, लोहगड किल्ले माझे आधीच पाहून झाल्याने यंदा थोडं पुढे जाऊन क्रमांक लागला राजमाचीला जायचा. मी पहिल्यादांच जात असल्याने "राजमाची" बद्दल मला प्रचंड उत्सुकता होती आणि मला राजमाची बद्दल एक गैरसमजूतही होती ती मला तिथे जाऊनच समजली ती पुढे तुम्हाला सांगणारच आहे.
ठरल्याप्रमाणे घरून सकाळी साडे सहाच्या दरम्यान निघालो आणि मजल दरमजल करत कुठे बासुंदी चहा पीत लोणावळाला पोहचलो. तुंग आणि राजमाची मध्ये एक साम्य आहे की जर तुम्ही पुणे पासून प्रवास करत असाल तर लोणावळा ओलांडून जावं लागत. त्याचा एक फायदाही आहे की कामात काम म्हणून लोणावळाची सफर होऊन जाते. राजमाचीला जायला लोणावळा ओलांडून अगदी खंडाळा येण्याचे पहिले जिथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे तिथून उजवीकडे वळावं लागत. सोपं करून सांगायचं झालं तर Della Resort म्हणून लोणावळा प्रसिद्ध स्थळ आहे त्याच रस्त्याला पुढे जाऊन "राजमाची" आहे.
मुख्य रस्त्यावरून उजवीकडे वळल्यावर मला जे लोणावळा दिसलं ते मी फक्त ऐकलं होत पण आज पहिल्यांदाच बघत होतो. रस्त्याच्या दुतर्फा लक्झरी बंगले, प्रत्येक बंगल्या समोर असलेल्या महागड्या गाड्या, काही बंगल्याच्या उंचच उंच संरक्षक भिंती आणि काही ठिकाणी घरांच्या जाहिरातीसाठी असलेले भले मोठे बॅनर. हे सर्व बघता बघता गाडी आपोआप हळू झाली आणि प्रत्येक महागड्या वस्तीच्या जवळपास असलेली गरीब लोकांची वस्तीही नजरेतून सुटली नाही.
Della Resort पर्यंत रस्ता चांगला आहे त्याचे पुढे कच्चा रस्ता सुरु झाला. पुढे जाऊन एक चेक पोस्ट लागला तिथे प्रत्येक गाडीसाठी ५० रुपये मोजावे लागले. तिथे असलेल्या एकाने सांगितल्या प्रमाणे अजून १६ किमीचा रस्ता कापायचा होता आणि पुढचा रस्ता बराच खराब आहे. ज्याप्रमाणे त्यानी सांगितलं तिचं हकीकत होती रस्ता खराब असल्यापेक्षा रस्ताच न्हवता असं म्हटलेलं बर राहील. पण गाडी लावून चालत जावं हेही मान्य न्हवत म्हणून हळूहळू देवाचं नाव घेत गाडी चालवत राहिलो. मी जेव्हा जात होतो तेव्हा पाऊस न्हवता पण जे भर पावसाळ्यात आले होते त्याचं भरपूर कौतुक वाटलं आणि आपोआप माझ्या तक्रार करण थोडंका होईना कमी झाल्या. अधेमध्ये चांगला रस्ताही लागला पण खूप कमी. थोडं पुढे गेल्यावर किल्ला, त्याची तटबंदी आणि त्या वर झळकत असलेला भगवा पाहू शकत होतो पण मध्ये दरी असल्याने डोंगराला फेरा मारून जावं लागलं. निम्म्यांपेक्षा जास्त अंतर पार केल्यावर एक छोटा पूल येतो त्यापुढे चारचाकी गाड्या शक्यतो जावू शकत नाही त्यामुळे तिथे बरेच गाड्या लावलेल्या होत्या. जर तुम्ही मोठी गाडी घेऊन येत असाल तर तिथेच लावून पुढे चालत या. छोट्या गाडी वर असल्याने मला गाडी थेट गडाच्या पायथ्यापर्यंत घेऊन येणं शक्य होतं.
मी आणि पाठीमागे दिसत असलेला "श्रीवर्धन" किल्ला
पुढच्या १५ मिनिटात उर्वरित अंतर पार करून गडाच्या पायथ्यशी पोहचलो. तिथे एक छोटं पण खूप सुंदर गाव होतं आणि या गावाचं नाव होतं "राजमाची". सुरवातीला सांगितल्याप्रमाणे इथे पोहचल्या वर एक गोष्ट समजली म्हणजे इथे पायथ्यशी असलेल्या गावाचं नाव "राजमाची" आहे किल्ल्याच न्हवे आणि इथून वरती चढल्यावर दोन जुळे किल्ले आहे "श्रीवर्धन" आणि "मनोरंजन". पायथ्यवर गाडी लावून थोडा आराम करून "गिर्यारोहण" करायला घेतलं. दोघं किल्ले चढायला अगदी सोपे आहे आणि बराचसा रस्ता सारखा आहे. चढायला पायऱ्या असलेण्या झपाझप किल्ला जवळ येत होता. थोडं पुढे एक महादेवाचं मंदिर लागलं तिथे एक आजोबा पेरू आणि काकडी विकत होते. त्यांच्याकडून गडाची माहिती घ्यावी म्हणून बरोबर जाऊन बसलो. तेव्हा समजल ते "राजमाची" गावात राहतात आणि इथे कधी कधी मंदिरातही झोपतात. राजमाची गावामध्ये एक थंड पाण्याचं कुंडही असून ते नक्की पाहण्यासारखा आहे असेही समजले. तिथूनच २ फाटे फुटतात एक रस्ता "श्रीवर्धन" आणि दुसरा "मनोरंजन" किल्ल्या वर जातो. मनोरंजन किल्ला बराचसा पडल्याने आम्ही थेट "श्रीवर्धन" वर जायचं ठरवलं.
तरी बघता बघता इथेच १२ वाजून गेले होते. वेळेचं गणित थोडं गडबडलं होतं. येतांना नको तेवढ्या वेळी थांबल्याने आणि मध्ये रस्ता खराब असल्याने बराच वेळ खर्ची पडल्याने उशीर झाला होता. म्हणूनच आता कुठे जास्त न थांबता किल्लावर पोहचायचं ठरवलं.
उर्वरित माहिती भाग दोन मध्ये ..
Comments