तुम्ही तुमच्या लहान मुलांना कोडींग शिकवण्याचा प्रशिक्षण केंद्रामध्ये घातलं का? अजून नाही? अरे बापरे!
मग तो भविष्यात यशस्वी कसा होणार?
मग तो त्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार?
अरे तो Steve Jobs कसा बनणार?
आणि सर्वात महत्वाचं, तो श्रीमंत कसा होणार?
हे मी नाही बोलत आहे, एक लहान मुलांना घरी बसून कोडींग शिकवणारी एक संस्था आहे त्यांचं असं म्हणणे आहे. तुमच्यापैकी खूप लोकांनी या संस्थेची जाहिरात टीव्हीवर पाहिली असेल. ज्यांनी ती पहिली नसेल त्यांना मी परत सांगतो जाहिरातीमध्ये ही संस्था असं सांगते, जर तुमच्या मुलांना कोडींग शिकवली नाहीतर तो भविष्यात खूप मागे पडेल. तो यशस्वी होऊ शकणार नाही. हे खरंच आहे का? आपण आपल्या लहान मुलांना खरंच कोडींग शिकवायला हवी का? ज्या वयामध्ये आपण मुलांना मूलभूत गोष्टी शिकवू शकतो तेव्हा त्यांना संगणक किंवा कोडींग शिकवायची गरज आहे का?
आणि विशेष म्हणजे हे फक्त संगणक किंवा कोडींग बाबतीत नाही तर हे सर्वच क्षेत्रामध्ये झालं आहे. जर तुमचा लहान मुलगा चित्र चांगला काढत असेल तर चित्रकला प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवा, जर तो गाणं चांगला म्हणत असेल तर गाण्याचा प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवा, जर तो क्रिकेट चांगला खेळत असेल तर क्रिकेटच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवा. तो पुढे जाऊन त्याचा क्षेत्रामध्ये नक्की नावीन्य मिळवेलच.
हे सर्व चुकीचे आहे हे मी बोलत नाहीये पण ह्या सर्व गोष्टीचा अजून एक दुसरी बाजू आहे यावर मी बोलणार आहे.
जेव्हा पालक त्यांचा लहान मुलांना या सर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवतात तेव्हा कळत नकळत ते लहान मुलांवर जबाबदारी टाकतात आणि जबाबदारी सोबत थोडेफार तरी मानसिक तणाव, दडपण हि येतंच कि, आणि त्याचा लहान मनावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. हा विचार आपण करायला हवा.
लहान मुलांनी त्यांचा आयुष्य कसं मनसोक्त जगायला हवं पण हे करून पालक त्यांच्या अवती-भोवती एक कुंपण बांधून देतात आणि नियमांच्या पिंजऱ्यामध्ये बंधिस्त करून ठेवतात.
याला जोडून मला तुम्हाला किस्सा सांगावासा वाटतो. दोन मित्र असतात राम आणि श्याम. दोघेही एकाच इमारती मध्ये राहत असतात आणि हे दोघे एकाच वर्गात म्हणजे पाचवीला असतात. हे दोघे उत्तम प्रकारचे क्रिकेटपटू असतात. ते क्रिकेटचा मनसोक्त आनंद लुटत असतात. त्यांचा इमारती मध्ये लोकांना असे वाटायचे कि हे दोघे पुढे जाऊन मोठे यशस्वी क्रिकेटर बनतील. त्या दोघांना आजू बाजूच्या लोकांनी तर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी असे नावेही ठेवली. रामच्या वडिलांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी विचार केला, राम हा घराखालीच क्रिकेट खेळत बसला तर तो पुढे जाणार नाही त्याला प्रशिक्षण केंद्रामध्ये घातल पाहिजे, आणि जेमतेम ८-९ वर्ष्याच्या रामला ते प्रशिक्षण केंद्रामध्ये घेऊन गेले. जर तुम्ही कोणताही खेळाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये गेले असणार तर तुम्हाला माहित असेल, तिथे तुम्हाला खेळाचे नियम शिकवले जातात. जो राम आपल्या घराच्या खाली मनसोक्त, उत्स्फूर्तपणे क्रिकेट खेळत असे त्याला आता नियम शिकवण्यात आले. जसे कि गोलंदाजाच्या हाताकडे शेवटपर्यंत पाहावे.एक पाय पुढे टाकून खेळावे.हवेत किंवा वरतून फटका मारू नये. हे सर्व नियम पाळताना एकीकडे रामचे नाकीनऊ आले त्याला हेही समजायला तयार नव्हतं कि आपण हे नियम का पाळतोय? या सर्व गोष्टींमध्ये तो पुरता गोधळून गेला.जो राम सुरवातीला आनंदाने क्रिकेट खेळायचा तो आता खेळायला टाळाटाळ करू लागला. एक दिवस असा आला कि त्याने क्रिकेट खेळून कायमचे बंद करून टाकले. झाला, खेळ संपला.
दुसरीकडे श्याम पुढचे ४-५ वर्ष त्याचा घराखाली क्रिकेट खेळत राहिला. पुढे जसे जसे मोठा होत गेला तशी त्याची क्रिकेट मध्ये समजही वाढत गेली. त्याला वाटलं अजून आपल्याला चांगला खेळ खेळायचा असेल तर प्रशिक्षणाची गरज आहे. तो पुढे प्रशिक्षण केंद्रामध्ये गेला आणि त्याचा खेळ तिथे जाऊन अजून सुधारला आणि एकदिवस तो यशस्वी क्रिकेटर बनला. आता हे राम आणि श्याम सोबत झाले असे प्रत्यक्ष होतेच असं नाही. हि उदाहरणे देताना मला पालकांना एकच सांगू वाटते कि तुम्ही तुमच्या मुलांना मनसोक्त जगू द्या, त्यांची आवड जोपासा आणि कसलीही घाई करू नका.
या सर्व गोष्टीमागे एक छानसं उदाहरण द्यायचे म्हटले तर ते आहे "झहीर खान". झहीर खान हा भारताचा सुप्रसिद्ध गोलंदाज आहे. विशेष म्हणजे त्याने त्याच्या वयाच्या १५-१६ व्या वर्षापर्यंत कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण घेतले नव्हते. तरी तो आज यशस्वी आहे.तुम्ही सगळ्यांनी आवर्जून तारे जमीन पर चित्रपट पहिलाच असेल त्यातून एक खूप छानसा संदेश आपल्याला हा मिळतो कि: प्रत्येक मुलगा खास आहे त्यांना मनसोक्तपणे जगू द्या, त्यांची आवड निवड जोपासा आणि त्यांचातले गुण ओळखून त्यांना आयुष्य जगण्यात मदत करा. ज्याला ज्या क्षेत्रात आवड आहे ते त्याला निवडता आले तर कदाचित ते खूप काही चांगले आयुष्य घडवतील नाही का?
Comments