माणसाने प्रवास का करायचा?
या प्रश्नाचे अनेक उत्तर मिळतील, प्रत्येकाचे उत्तर या बाबतीत वेगळेही राहू शकते . एक मूलभूत उत्तर शोधायचा झाला तर .... प्रवासाने अनेक नवीन गोष्टींचा अनुभव येतो, स्थानिक परंपरा लक्षात येतात, तेथील खाणे-पिणे, वेषभूषा, कला आणि बरेच काही. तसा विचार केला तर कुठेतरी वाचून किंवा Youtube वर पाहून अनेक गोष्टी समजतात, पण ते अनुभवायच भाग्य फक्त तिथे पोहचुनच मिळतं. तेव्हा समजत आपण जो विचार करतो त्या पेक्षा हे जग खूप मोठ आणि वेगळ आहे. हेच मुख्य कारण आहे प्रवास करायच.
मी ह्यावेळी कधीच न पाहिलेल्या ठिकाण जाण्याची योजना आखली आणि ते ठिकाण म्हणजे हिमाचल प्रदेश.
हिमाचलमध्ये पोहचल्यावर लक्ष्यात येते कि थंडी किती जीवघेणी राहू शकते. मी राहतो ते ठिकाण म्हणजे पुणे आणि पुणे मध्ये थंडीला गुलाबी अशी उपमा दिली जाते. पण हीच थंडी जेव्हा रौद्ररूप दाखवते तेव्हा डोळ्यातून आलेले पाणी आणि हिरमुसलेले चेहरे मी अनुभवले आहे. आजूबाजूला हिमालयीन पर्वत रांगा आणि त्यावर चादर पांघरलेला बर्फाचा पांढरा थर पाहून स्वर्ग बहुतेक असंच दिसत असावं हे वाटत.
एका गावातून दुसऱ्या गावात जायचा म्हंटल तर डोंगराच्या कुशीतून जाणारा नागमोडी रस्ता. गाडीतून जात असताना दिसणारी एक फुटावर असलेली खोल दरी आणि दाट जंगल. हे सर्व पाहून गाडी चालकाचं महत्व डोक्यात चमकून जात.
आमचा हिमाचल प्रदेशसाठी प्रवास सुरु झाला अमृतसर येथून. हिमाचल प्रदेश मध्ये शिमला आणि कुलू मनाली हेच लोकप्रिय ठिकाण आहेत पण आम्ही डलहौझी आणि खज्जियार (चंम्बा) ला जाण्याचा निर्णय घेतला. हे दोघी ठिकाण शिमला आणि मनाली सारखेच थंड हवेचे ठिकाण (Hill Station) असून एका ब्रिटिश अधिकाऱ्याने स्थापित केले आहे. डलहौझी हिमाचल प्रदेशच्या उत्तरेकडे असल्याने येथून जम्मू काश्मीर जवळ आहे आणि आम्ही पुढे जम्मू कश्मीर मध्येही जाणार असल्याने आमच्या साठी डलहौझी सोयीस्कर होत.
अमृतसर पासून डलहौझी प्रवासाला आम्ही सकाळी १० वाजता सुरुवात केली. साधारणतः हे अंतर ३०० किमीचे आहे via पठाणकोट.
भारतीय लष्कराचा मामुन हा एक मोठा व महत्त्वाचा तळ पठाणकोट येथे आहे. २०१६ मध्ये भारतीय वायुसेनेच्या तळावर झालेल्या आतंकवादी हल्ला झाला होता.
साधारणतः १०-१२ तासाच्या सलग प्रवासानंतर आम्ही डलहौझी येथे पोहचलो. नागमोडी रस्ता, घनदाट जंगल आणि वाढत जाणारी थंडी हिमाचल प्रदेश दर्शवत होतं. सलग प्रवास आणि सहनशक्तीच्या पलीकडे जाणारी थंडी त्यामुळे डलहौझी मधील पहिली ओळख नक्कीच सुखदायक नव्हती. थंडीचा उचांक गाठला गेला तो डलहौझी मधील मॉल रोड (गांधी मार्केट) मध्ये आम्ही उतरलो तेव्हा तापमान २°C होते. तेव्हा प्रकर्षाने सर्वाना समजलं कि एवढा कमी तापमानामध्ये जगणं काय असते ते. आमचा १२ लोकांचा group होता पण अचानक एवढ्या थंडीने जो तो हादरून गेलेला. तेव्हापासून सगळ्यांची लगेच टोपी, हातमोजे, मफलर घेण्याची गर्दी सुरु झाली. पुढचे ३-४ दिवसामध्ये असा एकही दिवस गेला नाही जेव्हा कोणी थंडीचे कपडे घेयला गेला नाही.
डलहौझी मधील मॉल रोड ब्रिटिशकालीन शहराचा अनुभव देत होता. छोटे रस्ते, आजूबाजूला असलेले फूड स्टॉल, ब्रिटिशकालीन बांधकाम आणि गजबजलेले रस्त्या. पहिलाच दिवस असल्याने आणि अचानक वाढलेल्या थंडीने खिळखिळी झालेले शरीर यामुळे लगेच हॉटेल वर जाण्याचे ठरवले. हॉटेलवर पोहचून रुममध्ये जाऊन गरम ब्लॅंकेट मध्ये पडल्यावर थोडा जीवात जीव आला. इथे १-२°C मध्ये सर्व पत्ते गुंडाळून ठेवलेला मी काश्मीरमध्ये -१०°C काय असत याचा विचारही करवत न्हवत.
पुढील दिवशी सकाळी उठून जेव्हा बाहेर येऊन समोर दिसलं ते खोल दरी, घनदाट जंगल आणि समोर बर्फाचा थर असलेला हिमालय पर्वतरांगा. हिमालय जसा बघून हसून म्हणाला होता तुम्ही कितीही पुढे जा पण इथला राजा मीच आहे. तुम्हाला इथे माझ्या मर्जीनुसारच वागावं लागेल. थंडीच्या ठिकाणी गेल्यावर एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे गरम पाण्याचा हीटर. ते जर मिळालं नाही तर अगदी अर्धा दिवस फक्त गरम पाण्याची सोय लावण्यात जातो. तीही सकाळ आमची हीटर चालू करण्यात गेली. एवढ्या थंडीमध्ये हिटरच्याही काही मर्यादा असतात त्यामुळे आवरण्यात थोडा वेळ झाला आणि हिमालयाला बघत चहा पीत सर्वजण निघालो.
डलहौझीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही दैनकुंडला जायला निघालो. दैनकुंड हे डलहौझी परिसरातील सर्वात उंच शिखर असून तेथे एक मंदिर आहे. आमच्या हॉटेल पासून साधारणतः ५० किमी प्रवास करायचा होता पण पहाडी प्रदेश असल्याने नागमोडी, अरुंद रस्ता, घनदाट जंगल आणि खोलदरी बघता बघता केव्हा पोहचलो हेही लक्ष्यात आले नाही. रस्ता कोणताही असो पण प्रत्येक वेळी दिसते ते म्हणजे हिमालय आणि त्यावरील बर्फाचा थर. दैनकुंडला जातांना एक अनोखी गोष्ट दिसली म्हणजे डलहौझी पब्लिक स्कूल. अगदी डोंगराच्या कडेवर असलेल्या शाळा, आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आणि त्यांनी सुशोभीकरण केलेली जागा खूप सुंदर दिसत होती. डलहौझी पब्लिक स्कूल पाहून मला पाचगणी येथील शाळांची आठवण झाली. येथील मुले इतकी थंडी रोज सहन करता याबद्दल कौतुक करावा तेवढ कमीच. पुढे दैनकुंड आले. दैनकुंडच्या अगदी लगत भारतीय वायुसेनेच तळ असल्याने तेथे सुरक्षा कडक होती आणि कॅमेरामध्ये फोटो घेण्यासाठी मनाई होती.
बरोबर सकाळी ११ वाजता दैनकुंडला चढाई करण्यास सुरुवात केली. वेळ तर ११ ची होती पण वातावरण सकाळी ६ चे होते. डोंगराची चढाई तशी सोपीच होती फक्त रस्त्यावर थोडाफार बर्फ असल्याने घसरण्याची शक्यता होती. निम्मा डोंगर सर केल्यावर एक छोटे पठार आले तेथे आम्ही सर्वजण बसलो. तिथे एक ९-१० वर्षाची जवळपास रहाणारी मुलगीच भेटली. ती एक ससा घेऊन फिरत होती, जाच्याबरोबर पर्यटक फोटो घेऊ शकत होते. अर्थात त्यासाठी पैसे ती घेत होती. पण हे सर्व पाहून तिच कौतुक वाटलं, अगदी लहान वयात ती घर चालविण्यासाठी हे सर्व करत होती. परिस्थिती बेताची असेल तर काहीतरी जोडधंदा करावाच लागतो आणि मला नेहमी अश्या मुलांचे कौतुक वाटते आणि अर्थात वाईटही वाटते. ज्या खेळण्या-बागडण्याच्या वयात जबाबदारी पडल्याने बालपण हरवून जाते. खूप सारे आठवणी डोळ्यात साठवून आणि फोटो काढून वरती चढाई करण्यास सुरुवात केली.
उर्वरित सफर भाग दोन मध्ये ..
Comentários